अनेक इच्छुकांना संधी; दिग्गजांना फटका
माजलगाव /
माजलगाव नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी २६ सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत आज तहसील कार्यालयात पार पडली. प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार संतोष रूईकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पोपट निगळ यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी व विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या सोडतीमुळे माजलगाव नगरपरिषदेतील प्रभागनिहाय आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक नव्या इच्छुकांना राजकारणात प्रवेशाची संधी मिळाली असून, काही अनुभवी दिग्गजांना आरक्षित जागेमुळे मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नगरपरिषदेच्या हद्दीत सध्या ४९ हजार ४५३ लोकसंख्या असून, एकूण १३ प्रभागांमधून २६ नगरसेवक निवडले जाणार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी ३ जागा (त्यापैकी २ महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) यासाठी ७ जागा (त्यापैकी ४ महिला) राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एकूण १३ जागा महिलांसाठी राखीव असल्याने यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांचे वर्चस्व ठरण्याची शक्यता आहे.
🔹 प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले:
1️⃣ प्रभाग क्र. १ : (अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण
2️⃣ प्रभाग क्र. २ : (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण
3️⃣ प्रभाग क्र. ३ : (अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग, (ब) सर्वसाधारण महिला
4️⃣ प्रभाग क्र. ४ : (अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग, (ब) सर्वसाधारण महिला
5️⃣ प्रभाग क्र. ५ : (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण
6️⃣ प्रभाग क्र. ६ : (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण
7️⃣ प्रभाग क्र. ७ : (अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण
8️⃣ प्रभाग क्र. ८ : (अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण
9️⃣ प्रभाग क्र. ९ : (अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग, (ब) सर्वसाधारण महिला
🔟 प्रभाग क्र. १० : (अ) सर्वसाधारण महिला, (ब) सर्वसाधारण
1️⃣1️⃣ प्रभाग क्र. ११ : (अ) नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, (ब) सर्वसाधारण
1️⃣2️⃣ प्रभाग क्र. १२ : (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) सर्वसाधारण
1️⃣3️⃣ प्रभाग क्र. १३ : (अ) अनुसूचित जाती, (ब) सर्वसाधारण महिला
🔹 नगराध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी राखीव
यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी चुरस अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या शोधाला सुरुवात केली असून, स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत चर्चा, गाठीभेटी आणि तणाव वाढल्याचे चित्र आहे.
🔹 राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ
सोडतीनंतर अनेक इच्छुक उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असताना, काही प्रभाग आरक्षित झाल्याने काही दिग्गजांचे समीकरण कोलमडले आहे. त्यामुळे शहरातील राजकारणात नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल, तर जुने नेते आपला वारसदार पुढे आणण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता आरक्षण निश्चित झाल्याने सर्वच पक्षांनी अंतिम मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच स्थानिक गटांनी रणनीती आखायला प्रारंभ केला आहे. दिवाळीनंतर निवडणुकीची सरगर्मी आणखी वाढणार असून, माजलगाव नगरपरिषदेची लढत चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत.