बीड :
बीडकरांचे तीन पिढ्यांचे स्वप्न अखेर आज सत्यात उतरले. स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा “ड्रीम प्रोजेक्ट” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड – अहिल्यानगर रेल्वेमार्गाचा शुभारंभ मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते पार पडला.

रेल्वे स्थानक परिसरात झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी जिल्हाभरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे बीड जिल्ह्याच्या विकासाच्या नवनवीन शक्यता उभ्या राहतील, असा विश्वास लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला.
स्व. मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्णत्वास
बीडच्या लोकजीवनाशी निगडित हा प्रकल्प स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न होता. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक लक्ष घालून प्रकल्पाला वेग दिला. खासदार प्रितमताई मुंडे यांनी सातत्याने दिल्ली दरबारी पाठपुरावा करत प्रत्येक टप्प्याचा आढावा घेतला. राज्य सरकारकडूनही वेळोवेळी निधी उपलब्ध करून देण्यात आला.
जिल्ह्याचा विकासमार्ग
नव्याने सुरू झालेला हा रेल्वेमार्ग लवकरच परळी–बीड–अहिल्यानगरपर्यंत विस्तारला जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रवास सुलभ होणार असून व्यापार, उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाच्या संधींना नवे दालन खुले होईल. जिल्हावासीयांसाठी हा मार्ग “जीवनवाहिनी” ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
उपस्थित मान्यवर
या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, खासदार बजरंग सोनवणे, आ. धनंजय मुंडे, आ. नमिताताई मुंदडा, आ. विजयसिंह पंडीत, आ. विक्रम काळे, माजी आ. भिमराव धोंडे, माजी आ. संजयभाऊ दौंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याशिवाय रेल्वेचे अधिकारी – जनरल मॅनेजर सेंट्रल रेल्वे धरमवीर मीना, पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा, मुख्य अभियंता रजनीश माथूर, प्रमुख ऑपरेटिंग मॅनेजर श्यामसुंदर गुप्ता यांनीही सहभाग घेतला.
जिल्ह्याचे अधिकारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, सीईओ जितीन रहेमान, तसेच स्थानिक कार्यकर्ते, विद्यार्थी रेल्वे कृती समिती आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांचे आभार प्रदर्शन
या प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, रेल्वे प्रशासन, खासदार–आमदार, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या योगदानाचे स्मरण करून उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
बीड–अहिल्यानगर रेल्वेमार्गाचा शुभारंभ हा बीडकरांसाठी ऐतिहासिक क्षण ठरला आहे. आता या मार्गाचे लवकरच पूर्णत्व होऊन जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या प्रवासाला वेग आणि सोय मिळणार, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.