Beed Ahilyanagar Railway : बीड-अहिल्यानगर रेल्वेचा शुभारंभ; १६ थांबे, ५ तास ३० मिनिटांचा प्रवास

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

बीड- अहिल्यानगर रेल्वे प्रवासाला सुरुवात : २५ वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण

Amazon

Amazon App Player

Download Now

बीड :

Beed Ahilyanagar Railway : बीडकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्यावर आज (१७ सप्टेंबर) अखेर बीड ते अहिल्यानगर डेमू रेल्वेचा शुभारंभ होणार आहे. तब्बल पंचवीस वर्षांपासून रखडलेला बीड-अहिल्यानगर-परळी रेल्वे प्रकल्प आज पहिल्या टप्प्यात प्रत्यक्षात उतरणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा कंदील दाखवण्यात येणार असून बीडकरांच्या विकासाच्या दिशेने हा मोठा टप्पा मानला जात आहे.

२५ वर्षांचा संघर्ष आणि रेल्वेचं वास्तवात रूपांतर

बीडकरांच्या स्वप्नातील रेल्वे २५ वर्षांपासून केवळ कागदावर होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत कामाला गती मिळाल्याने अखेर बीडकरांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळत आहे. बीड शहराजवळ पालवण चौकात उभारलेले नव्या धाटणीचे भव्य स्थानक आता प्रवाशांचे स्वागत करण्यास सज्ज झाले आहे.

रेल्वेचा वेळापत्रक

या मार्गावर रोज एकच गाडी धावणार आहे. मात्र ही सेवा आठवड्यातील सहा दिवसच उपलब्ध राहील. रविवारी रेल्वे बंद असेल.

गाडी क्रमांक ७१४४१ – अहिल्यानगर ते बीड – सकाळी ६:५५ प्रस्थान, दुपारी १२:३० आगमन

गाडी क्रमांक ७१४४२ – बीड ते अहिल्यानगर – दुपारी १:०० प्रस्थान, सायं. ६:३० आगमन

खर्च आणि वेळेची तुलना

रेल्वे प्रवासासाठी बीड – अहिल्यानगर तिकीट केवळ ४५ रुपये ठेवण्यात आले आहे. साधारण १६८ किमीचा हा प्रवास रेल्वेने ५ तास ३० मिनिटांत पूर्ण होईल.

त्याच्या तुलनेत रस्त्याने प्रवास केल्यास अंतर १२८ किमी असून वेळ साधारण ३ तास लागतो. मात्र प्रवाशांना बसभाडे २०० रुपयांपर्यंत मोजावे लागते. यामुळे रेल्वे मार्ग स्वस्त पण वेळखाऊ, तर रस्ते मार्ग महागडा पण कमी वेळात पोहोचणारा ठरणार आहे.

बीड शहरातील रेल्वे स्थानक शहरापासून जवळपास ६ किमी अंतरावर आहे. बीड बसस्थानकापासून प्रवाशांना रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षा भाडे १५० ते २०० रुपये आहे.

बीड- अहिल्यानगर मार्गावरील थांबे

या मार्गावर एकूण १६ स्थानकांचा समावेश आहे :
बीड, राजुरी, रायमोर, विगणवाडी, घाटनांदुर, आंबळनेर, बावी, किणी, आष्टी, कडा, धानोरा, सोलापूरवाडी, लोणी, नारायणडोह आणि अहिल्यानगर.

प्रकल्पाचा आर्थिक पट

एकूण २६१ पैकी १६६ किलोमीटर लोहमार्ग पूर्ण

केंद्र व राज्याचा समान वाटा असलेला प्रकल्प

सुरुवातीचा खर्च ३५५ कोटींवरून तब्बल ४८०० कोटींवर पोहोचला

राज्य सरकारकडून आतापर्यंत २२४१ कोटींचा निधी

आठवड्यात सहा दिवस धावणारी सेवा, रविवारी सुट्टी

सुरुवातीला रेल्वे डिझेलवर धावणार

बीडकरांचे स्वप्न प्रत्यक्षात

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशीच रेल्वेसेवेचा शुभारंभ होत असल्याने या प्रकल्पाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. रेल्वे आल्यानंतर बीडच्या दळणवळणात आणि विकासात नवी भर पडेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now