Beed News : बीड मध्ये उद्याही पावसाचा जोर कायम राहणार; जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा तडाखा कायम असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाले धोक्याच्या पातळीवरून वाहू लागले आहेत, तर लहान-मोठे प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मंगळवार, दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

ही सुट्टी अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा, सरकारी व खाजगी शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र या सर्व आस्थापनांवर लागू राहणार आहे. मात्र 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वतयारीसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना या सुटीतून वगळण्यात आले आहे.

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा जोर सुरू असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील 16 मध्यम व 126 लघु प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. आष्टी, शिरूर, पाटोदा, वडवणी, गेवराई, अंबाजोगाई, परळी यांसारख्या तालुक्यांतील गावांचा संपर्क तुटला आहे.

आष्टी तालुक्यातील कडा परिसरातील सहा गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. कडा गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 17 नागरिकांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली. गहू खेल भागात आलेल्या पुरात कांद्याचा चाळ वाहून गेला असून त्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. शेतकऱ्यांचे डोळ्यादेखत कांदा वाहून जाताना भावनिक दृश्ये पाहायला मिळाली.

बीडच्या पाटसरा गावातील शेततलाव फुटल्याने पाच ते सात एकर जमीन वाहून गेली आहे. सोयाबीनसह अनेक पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

धरणांमधून विसर्ग सुरू

जिल्ह्यातील अनेक नद्या-नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. मुसळधार पावसानंतर राक्षसवाडी येथील छोटे धरण फुटले असून हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. माजलगाव प्रकल्पाचे 11 दरवाजे उघडण्यात आले असून हजारो क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आष्टी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने कडी नदी व कमलेश्वर नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

हवामान विभागाचा इशारा

हवामान विभागाने पुढील 24 तासांतही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत सुट्टी जाहीर केल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now