पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना बारामतीतील गोविंदबाग येथील निवासस्थानातून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी काही वेळापूर्वी रुबी हॉल क्लिनिक येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीदरम्यान शरद पवारांचे नातू पार्थ पवार आणि जय पवार हेही उपस्थित होते.
दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत रुबी रुग्णालयाचे डॉ. लोढा यांनी माध्यमांना माहिती दिली. शरद पवार यांना थकवा जाणवत असून छातीत कफ झाल्यामुळे त्यांची सविस्तर तपासणी करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
तपासण्यांचे सर्व अहवाल आल्यानंतर पुढील उपचारांबाबत आणि रुग्णालयात किती दिवस ठेवायचं याबाबत निर्णय घेतला जाईल, असंही डॉ. लोढा यांनी सांगितलं. शरद पवार यांना अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आलेलं नसून, त्यांना प्रायव्हेट रुममध्ये ठेवण्यात आलं आहे. सध्या काळजी करण्यासारखं काही नसल्याचंही डॉक्टरांनी नमूद केलं.
शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी राज्यभरातून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.