Loha Accident : भरधाव कार दुभाजकावर आदळून पेटली; होरपळून एकाचा जागीच मृत्यू

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

लोहा |

Amazon

Amazon App Player

Download Now

नांदेड–लातूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (ता. २५) सायंकाळी भीषण अपघाताची घटना घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजकावर जोरात आदळली आणि काही क्षणांतच कारने पेट घेतला. या दुर्घटनेत कारमधील एका व्यक्तीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. ही घटना सोनखेडपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर वंदना पेट्रोल पंपाजवळ सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

नांदेडहून लोह्याकडे येणारी एमएच २६ एके ६४४४ क्रमांकाची कार अचानक चालकाच्या ताब्यातून सुटली. कार दुभाजकावर चढल्यानंतर उलटली आणि तीव्र घर्षणामुळे काही क्षणांतच वाहनाने पेट घेतला. अपघातानंतर कारचा दरवाजा उघडता न आल्याने आत अडकलेल्या नांदेड येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला. वृत्त लिहेपर्यंत मृताची ओळख पटलेली नव्हती.

घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पांडुरंग माने यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ लोहा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्यानंतर महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

अपघातग्रस्त कारमधील प्रवासी माळेगाव यात्रेसाठी निघाले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र प्रत्यक्षदर्शींनी अपघातस्थळी रस्ता सुरक्षा क्रमांक १०३३ कडून वेळेत मदत मिळाली नसल्याचा आरोप केला आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदेड जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून, या अपघाताबाबत सोनखेड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now