लातूर जिल्ह्यातून एक अत्यंत क्रूर, माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. औसा–सोलापूर महामार्गापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या वानवडा रस्त्यावर शनिवारी रात्री उभी असलेली एक कार तब्बल चार तास जळत राहिली. या आगीत कारमध्ये हातपाय बांधून टाकलेल्या एका तरुणाचा अक्षरशः कोळसा झाला आहे.

ही धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील असून, प्राथमिक तपासात हा अपघात नसून नियोजनबद्ध घातपात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून हे हत्याकांड घडल्याची शक्यता तपास यंत्रणा गृहित धरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास वानवडा रस्त्यावर एक स्कोडा कार पेटलेली स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली. आगीचे लोळ आणि धुराचे लोट पाहून नागरिकांनी तात्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
आग विझवल्यानंतर कारची पाहणी केली असता आतमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह जळून कोळसा झाल्याचे आढळून आले. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे मृत व्यक्तीचे हातपाय बांधलेले होते. त्यामुळे हा अपघाती मृत्यू नसून अत्यंत क्रूर पद्धतीने केलेला खून असल्याचा पोलिसांचा संशय अधिक बळावला आहे. प्रथमदर्शनी हा मृतदेह गणेश गोपीनाथ चव्हाण (वय ३५) यांचा असल्याचे सांगितले जात आहे.
मृत गणेश चव्हाण हे एका खासगी फायनान्स कंपनीत लातूर डिव्हिजनचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. नातेवाइकांच्या माहितीनुसार, त्यांचे अनेकांशी आर्थिक व्यवहार सुरू होते. विशेष म्हणजे, ज्या स्कोडा कारमध्ये त्यांचा मृतदेह सापडला, ती कार हप्ते न भरल्यामुळे चव्हाण यांनीच फायनान्स कंपनीच्या माध्यमातून ओढून आणलेली होती. त्यामुळे या कारचा वापर करूनच त्यांची हत्या करण्यात आली का, याचाही तपास केला जात आहे.
या घटनेमागे अनैतिक संबंध, आर्थिक वाद, वैयक्तिक शत्रुत्व की आणखी काही खोल कट आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. लातूर जिल्ह्यातील या थरारक घटनेने नागरिकांमध्ये संताप आणि भीती दोन्ही निर्माण झाली असून, आरोपी लवकरात लवकर गजाआड जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.