
परभणी : परभणी-वसमत रस्त्यावर शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. दोन कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात राहाटी परिसरातील विश्वशांती ज्ञानपीठाजवळ घडला.
मृतांमध्ये बाबाराव दतराव साखरे (रा. आरळ ता. वसमत जिल्हा हिंगोली), विमलबाई बालासाहेब जाधव (रा. पिंगळी ता. परभणी) आणि कांताबाई अंबादास कातोरे (रा. आरळ ता. वसमत जिल्हा परभणी) यांचा समावेश आहे. गंभीर जखमींमध्ये साईनाथ रामचंद्र काकडे आणि हरी बालासाहेब जाधव या दोघांवर परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फिर्यादी सखाराम साखरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बाबाराव साखरे हे स्विफ्ट डिझायर (एमएच ३८ एडी ३५४१) कारमधून आरळ येथून परभणीकडे जात होते. तेव्हाच समोरून भरधाव वेगात येणाऱ्या क्रेटा कारने (एमएच २२ बीसी ७८८८) निष्काळजीपणे कार चालवत समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही कार चिरडल्या गेल्या व घटनास्थळीच तिघांचे प्राण गेले.
घटनेची माहिती मिळताच ताडकळस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी क्रेटा कारचालकाविरुद्ध ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
आंबा घाटात बसचा अपघात; 37 प्रवासी जखमी
दुसऱ्या घटनेत रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात बसचा भीषण अपघात झाला. वळण घेताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाहेर गेली. या दुर्घटनेत 37 प्रवासी जखमी झाले असून यापैकी 8 जणांची प्रकृती गंभीर आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मदतीसाठी धाव घेत अनेक प्रवाशांना बाहेर काढले. सर्व जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातांच्या या सलग घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, वेग आणि निष्काळजीपणा हा अपघातांना कारणीभूत ठरत असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.