पुणेकरांनो सावधान! औंधनंतर आता धानोरीत पहाटेच बिबट्या; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

Pune News: विमानतळ, औंध या भागांमध्ये बिबट्याचं दर्शन झाल्यानंतर आता धानोरी परिसरातील मुंजाबावस्तीमध्येही सोमवारी पहाटे बिबट्या दिसल्याची घटना उघडकीस आली आहे. पहाटेच्या सुमारास निवासी भागात फिरत असलेल्या बिबट्याचे स्पष्ट फुटेज सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने परिसरातील नागरिकांची झोपच उडाली आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

धोक्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभाग आणि वन्यजीव बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शोधमोहीम सुरू करण्यात आली असून परिसरात पिंजरे आणि कॅमेरा ट्रॅप्स बसवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.


सीसीटीव्हीमध्ये बिबट्याची हालचाल कैद

मुंजाबावस्ती परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बिबट्या पहाटे निर्धास्तपणे फिरताना दिसला आहे. हे फुटेज समाजमाध्यमांवर झपाट्याने व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं.
वनविभागाने याची पुष्टी करताना सांगितलं की, बिबट्याने शहरात प्रवेश कशा मार्गाने केला याचा शोध घेण्यासाठी अनेक सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासले जात आहेत.

प्राथमिक अंदाजानुसार हा बिबट्या जवळच्या संरक्षण वनक्षेत्रातून किंवा मुळा नदीकाठच्या हिरव्या पट्ट्यातून शहरात शिरला असावा. मागील काही वर्षांत निगडी, दिघी-डीआरडीओ, सीएमई-बोपखेल आणि धानोरी परिसरात बिबट्यांची हालचाल वारंवार दिसून आल्याने हा मार्ग बिबट्यांसाठी नैसर्गिक कॉरिडॉर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


नागरिकांना सतर्कतेचं आवाहन

मुंजाबावस्ती, लोहगाव आणि विमानतळ परिसरात वनविभागाने पिंजरे आणि कॅमेरा ट्रॅप्स बसवले असून, बिबट्याच्या हालचालींचे निरीक्षण सुरू आहे.
वनविभागाने परिसरातील नागरिकांना खालील उपायांचे पालन करण्याचे आवाहन केलं आहे—

पहाटे व रात्री अनावश्यकपणे बाहेर जाणे टाळावे

लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नये

कचरा, पाळीव प्राण्यांचं अन्न घराबाहेर ठेवू नये

कोणतीही नवीन माहिती तातडीने वनविभागाला कळवावी

अफवांवर विश्वास ठेवू नये


औंधमध्येही बिबट्याचं दर्शन

पुण्यातील औंध परिसरात काही दिवसांपूर्वीच बिबट्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. एकाच परिसरात तो मुक्तपणे फिरत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. शहराच्या मध्यवर्ती भागात बिबट्या दिसल्याची घटना थंड झालेली नसतानाच आता धानोरीतील दर्शनाने पुणेकरांची चिंता वाढवली आहे.

सध्या वनविभाग व रेस्क्यू टीमकडून बिबट्याचा शोध सुरू असून, आसपासच्या परिसरात अतिरिक्त गस्त वाढवण्यात आली आहे. शहरात सलग दोन ठिकाणी बिबट्यांची एन्ट्री झाल्याने वन्यजीव हालचालींच्या बदलत्या पॅटर्नवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now