मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
परभणी |
गोदावरी नदीच्या महापुरामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेल्या पाथरी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे, अशी ठाम मागणी पाथरी विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश विटेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.

आ. राजेश विटेकर यांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तातडीने मदतीसाठी शासनाने विशेष उपाययोजना राबवाव्यात, अशी विनंती केली. पाथरी, मानवत, सोनपेठ आणि परभणी या चारही तालुक्यांतून वाहणाऱ्या गोदावरी नदीला सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात आलेल्या पुरामुळे नदीकाठची हजारो एकर शेती पूर्णतः नष्ट झाली आहे.
या महापुरात नदीच्या बॅकवॉटरचा फटका बसून अनेक ठिकाणी १५ ते २० किलोमीटरपर्यंत पिकांचे आणि जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच सलग अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके पूर्ण पने खराब झाली असून, शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. काही काही ठिकाणी शेतामध्ये माती देखील पूर्णपणे वाहून गेलेलि अशी माहिती आमदार विटेकर यांनी दिली.
“सध्याच्या शासन नियमांनुसार मिळणारी नुकसानभरपाई ही पुरेशी नसून, या भागातील आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेता खास विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची आवश्यकता आहे,” असे आ . राजेश विटेकर यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पूर व अतिवृष्टीग्रस्त भागांसाठी मदतीचा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या प्रस्तावात पाथरी मतदारसंघातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांची विशेष बाब म्हणून नोंद व्हावी, अशी आग्रही मागणी देखील आमदार राजेश विटेकर यांनी केली.
शेतकऱ्यांना सध्या बियाणे, खते, अन्नधान्य, निवारा आणि तातडीच्या आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. त्यामुळे पंचनामे जलदगतीने पूर्ण करून तत्काळ मदतकार्य सुरू करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली.
“हे संकट फक्त आर्थिक नव्हे, तर शेतकऱ्यांच्या संपूर्ण जीवनावर आलेले आहे. त्यामुळे शासनाने केवळ नुकसानभरपाईपुरते मर्यादित न राहता, पुनर्वसन व शेती पुनर्रचनेसाठी स्वतंत्र विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करणे अत्यावश्यक आहे,” असे आमदार राजेश विटेकर यांनी स्पष्ट केले.