राज्यात रविवारी नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालांनंतर भंडारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. नगरपालिकेच्या मतमोजणी केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये गंभीर घोळ झाल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला होता. या आरोपानंतर भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत सात कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे.

निवडणुकीची मतमोजणी रविवारी पार पडली. यावेळी भंडाऱ्यातील प्रभाग क्रमांक ३ मधील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवार करुणा राऊत यांचं नाव एका ईव्हीएम मशीनमध्ये नसल्याचं आढळून आलं. याबाबत संबंधित उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी केली. चौकशीत ईव्हीएम संदर्भात अक्षम्य चूक झाल्याचं स्पष्ट झालं. ही गंभीर बाब मान्य करत भंडारा जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी मतमोजणी केंद्रावर कार्यरत असलेल्या सात कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केलं.
या कारवाईमुळे भंडारा जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. प्रशासनाने यापुढे अशा चुका होऊ नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत.
निलंबित कर्मचाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
मोहम्मद इसरार, उपविभागीय अधिकारी, टेकेपार
ए. एन. मळघने, तलाठी, चांदोरी
पियुष शक्करवार, लिपिक-टंकलेखक, नगर परिषद भंडारा
के. एच. लांजेवार, शिक्षक, जे. एम. पटेल महाविद्यालय भंडारा (केंद्राध्यक्ष)
जी. एस. नागदेवे, शिक्षक, विकास माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय (मतदान अधिकारी क्रमांक १)
महेश हेमराज दुर्गाडे, सी.ई.ए., प्रधानमंत्री ग्रामसडक योजना (मतदान अधिकारी क्रमांक २)
लीनादेवी चीचमलकर, शिक्षक, नूतन कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय (मतदान अधिकारी क्रमांक ३)